Wednesday, December 24, 2008

NRI

एकवेळ अशी येते की आकाशाचं होतं छप्पर...
आणि पाय रोवून जिथे उभे असतो तेच घरं...
आपणच होतो आपले जिवलग...
नेटाने धरून ठेवतो चार भिंती...

संध्याकाळ होते आणि आपल्या झाडाकडे उडावसं वाटतं...
पण तिथे जर कुणी नसेल आता आपली वाट बघतं ?
बसल्या फांदीवर रात्र निघून जाते...
एक गेली तशा बाकीच्या जातील...

पण पसरून बसलेल असत कुणी तिकडे जुने अल्बम्स्..
कुरवाळत.. आपल्या गणतीतही नसलेली बक्षिसं..सर्टिफिकेट्स
आणि तिकडेही सरते रात्र...
आवरता आवरता आठवणींचे पसारे...

नाही म्हणायला रोजच गप्पा होतात, विचारपूसही जेवण- खाण्याची
पण पोट भरत नाही.. हे काय सांगितल नाही तरी, कळत नाही?
जमवतो रोजचं आणि सणासुदीचं सारं...
हं...हाताची चव थोडीशी कमी पड़ते...

बेसावध हळव्या क्षणी ऐकायची असते.. दूरून एक कातर हाक..
ज्यानंतरच्या कल्लोळात कुठ्ल्याचं व्यवहारांना सापडू नये आपली वाट..
पण गळ्याशी दाटलेलं दूर सारून हसायची...
त्यांचीही सवय हुकुमी असते...

सुरवातीच नाटक असत, गोडच गोड.. छान छान.. मजाच मजा..
चार दिवसांनी खरही वाटायला लागत.. भूमिकेत शिरता शिरता..
आजूबाजूला सापडतात.. नवी नाती.. नवे सोबती..
आणि नव्या नवलाईची नवी घरटी आकारतात..

आपल्याला वाटतं आता वाट विसरलो अन् ते वाट बघायला..
जबाबदारांच्या अदृश्य शृङ्खला.. आपणच हौसेने मिरवलेल्या
इकडे मुसमुसत झाड़.. तिकडे वेड पाखरू..
आयुष्य नावाचं पाणी मधल्या मधे वाहून जातं..

आकाशाची स्वप्नं..अशीच बरसत रहातात..
त्यात मातीचे अश्रू बेमालूम मिसळतात..
आणि बघणार्‍यानां येतो फ़क्त यशाचा सुगंध..

अश्या वेड्या पाखरांची मंडळ होतात.. संमेंलने..
आणि विरही झाडांचे ज्येष्ठ नागरिक संघ.. नी कट्टे..
आम्हाला काय? दोन्हीकडून निमंत्रण अणि टाळ्या!!

3 comments:

 1. aaeeshappat anushree... kaay lihilay !!!
  >> सुरवातीच नाटक असत, गोडच गोड.. छान छान.. मजाच मजा..
  चार दिवसांनी खरही वाटायला लागत.. भूमिकेत शिरता शिरता..
  आजूबाजूला सापडतात.. नवी नाती.. नवे सोबती..
  आणि नव्या नवलाईची नवी घरटी आकारतात..

  आपल्याला वाटतं आता वाट विसरलो अन् ते वाट बघायला..
  जबाबदारांच्या अदृश्य शृङ्खला.. आपणच हौसेने मिरवलेल्या
  इकडे मुसमुसत झाड़.. तिकडे वेड पाखरू..
  आयुष्य नावाचं पाणी मधल्या मधे वाहून जातं..
  >>
  he tar khoopach khaas !! pratyek NRI chyaa manaatalyaa bhaavanaach aahet yaa !
  Keep up the good writing :)

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...