Wednesday, June 10, 2009

bk 2 pavillion..

अजून माझ्या डोळ्यात त्या फुलांच्या रानातले रंग आहेत...
हातावर टिपलेले हिमकण..अन त्यांची सोनेरी झळाळी...
शहारा उमटवणारे बर्फाळी वारे..बर्फातल्याच पाउलखुणा..
गर्द वनराईत पहुडलेली घर...उन्हात न्हाणारे हिरवे गालिचे..
कुड्कुड्णार्‍या थंडीत वितळणारं आईस्क्रीम्..गरम कॉफी..
जिभेवर विरघळणारी चॉकलेट्स्..खरं तर विरघळलेली मी..
डोंगरवाटांतला एकांत..शुभ्र शिखरांशी थोडं हितगुज..गप्पा..
चल्..बघ्..डोळ्यात साठवं..जग..म्हणत भिनणारा निसर्ग..
निळ्या निळ्या डोळ्यांची गोंडस बाळं..त्याहून निळशार पाणी..
त्यात राजहंसाप्रमाणे विहरणार्‍या होड्या..आणि खरे राजहंस...
इमारतींच्या घोळक्यातून वाट काढत जाणार्‍या नद्या..कालवे..
रस्त्यात सांडलेला आनंद..त्याने बहरून आलेले हजारो गुलाब..
रंग रंग..गंध गंध..सोनेरी केसांच्या पर्‍या..त्यांचा किलबिलाट..
लाटांशी सुरांची जुगलबंदी..कुठे कैमेरा वा ब्रश घेउन गुंग चित्रकार..
निसर्गच लाडात आलेला..त्याचच मुक्त विद्यापीठ..घ्या..हवं ते..
थोडा उन्हाळा..थोडा हिवाळा..क्ल्यामैक्सला पाउसही..मनात वसंत..
कुण्याकाळचे शिलेदार किल्ले..पुतळे..कोरून ठेवलेले काही जुने क्षण..
मनात दाटून येतात आप्त..पुस्तकं..सिनेमे..प्रवास..आठवणी..गोष्टी..
ओसंडून वाहाणारी श्रीमंती..रस्त्यात फुललेली दुकानं..रेस्तराँज...
अगम्य न आकर्षक भाषा..लकबी.. हसणं..चालणं..स्वछंदी जगणं..
स्वप्नात पाहिलं असेल आधी...अनोळखी चेहेरे..ओळखीच हसू
कोणं कुठली म्हणत आपली आपली होऊन जाणारी माणसं..
स्वप्नं अशी फुलतात, बहरतात, लगडतात्..वेचूनही घेता येतात..
कधी कधी फक्त घ्यायचं असतं..थोडसं हावरटपणे..मुक्त हस्ते..
चल.. ने..बघू..जिथे कुठे..म्हणून वाहायचं झुलायचही असतं..
वार्‍याला ऐकवू द्यायच त्याच गाणं.. सोबत गायचही असतं..
हिरव्या गवतात पिवळीधमक फुलं बहरतात..मनात गाणी..
आणि झर्‍यांसारखी झुळझुळू लागतात.. आतल्या आतचं..
जग इतकं सुंदर आहे..स्वर्गाच्या मागे का धावावं उगाचं...
दाट सायीच्या दह्यासारख.. माझं मन आता गोड झालय...
हलक हलक होऊन ते भिरभिरत राहात रमत आठवणीत..
अशाच फुललेल्या राहू देत मनात कायम ह्या आठवणी..
दिवसभरातल्या ब्रेक मधे चघळायला चॉकलेट सारख्या..
डोळ्यातल्या पाण्यात डूंबू देत ती निळीशार स्वप्नं, राजहंस..
गवसू देत हिरव्या वाटा..गुलाबांची रानं, झरे, नद्या, हिमशिखरं..
रेंगाळू दे जिभेवर आईस्क्रीम्स, चॉकलेट्स, चीझ, बर्फाचीही चव..
खेळू दे रंगांना, कोवळ्या उन्हाला..माणसांना..आठवणींनाही..
परत परत जाऊ दे मला स्विझरलैंडला..परत परत जाउ दे...
अनुश्री

1 comment:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...