Friday, July 2, 2010

अहं

माझ्या विचारांच्या चक्रीवादळात, हे कागद वाहून जातात
वाटा विरघळू लागतात, माझ्या उष्ण पावलांच्या दाहाने
आकाश फाटायला लागत, कारण मी त्यात मावत नाही
देवही चिंतेत पडतो, जेव्हा मी कल्पना करू लागते
मी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....

स्वतःच्या गरजांसाठी, भीतींसाठी मला लाज वाटत नाही
ना वाटते भीती मला, अंधार्‍या एकट्या रस्त्यांवरून जाण्याची
मी गडद, काळी, गुळगुळीत, डोहातल्या कातळासारखी गार पण
माहितीच्या जंजाळात सराईतपणे पोहताना, मला ओढ शून्याची
मी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....

मीच असते सुंदर, मूर्ख, एक शोभिवंत बाहुली, मिरवणारी
कधी हजार गणिते करून, मी शक्यतांना प्रचंड छळणारी
मीच असते काम, क्रोध, मत्सर, वासनांमध्ये गुरफटणारी
कधी हातात आलेल सर्व सोडून मी विरक्त, दूर पळणारी
मी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....

माझ माणसांवर प्रेम आहेही पण खर तर फक्त स्वतःवर
काळाच्या चौथ्या मितीत गुदमरते आणि निर्वातात करते वावर
कधी चिंता करते विश्वाची तेव्हा मीच असते व्यापून ब्रह्मांड
जणू फक्त मला निर्मिलय ब्रह्मांने, का मीच दिलाय त्याला जन्म !
मी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....

मी स्त्री आहे, जन्मदात्री आणि जाणवत असण्यातल सामर्थ्यही
पण मीच उसळते आवेशात आव्हानांनी गाजवायला पुरुषार्थही
मीच गोड गुलाबी असते नाजूकही ठिसूळ अर्धी अपूर्णही
पण असते पूर्णही, अतुल्य, अजिंक्य, कठोर आणि एकटी
मी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....

आता होऊ नये एकाग्र चित्त मी, सगळेच भस्मसात होईल
विखुरले आदि जर, त्या महास्फोटातून नवे विश्व जन्म घेईल
मी उर्जा, बीजांतून निद्रिस्त, अणू रेणूत ध्यानस्थ, सूक्ष्म अन् अनंत
पण जागा होतो अहं, "मी" जेव्हा, होते मूर्त, उरते "अनुश्री" फक्त
मी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम...

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...