Friday, July 2, 2010

पाउस.. पाउस.. पाउस


माझ्या मनातला पाउस, अजून काही महिने
या ओसाड मातीत जपायचाय...
कवितेचा बहर, या मृगजळातच, काही काळ
कोमेजू न देता जगवायचाय...

विरहाच्या झळासोबत मी भिरभिरत जाते.....
आणि आठवणींच्या त्या सदाहरित वनांतून घेउन येते
पाउस.....

पाउस.....
मुसळधार पाउस..
वादळवारं..नासधूस
मातीचा गंध..
हिरवा छंद..
कडाडणार्‍या विजा..
भिजण्याची मजा..
बेफाम समुद्र लाटा..
विस्कटलेल्या वाटा..
चिखल.. निसरडं..घसरण
प्रेमात पड़ण..रडण..सावरण

पावसातल्या चिंब भेटी-गाठी..
आणि ओल्या आणा-भाका
धुक्यात पहाटे विरलेल्या..
स्वप्नांच्या अस्पष्ट हाका
नवा पाउस नवं प्रेम..
नवा विरह नवी हूरहूर
पहिल्या पावसानंतरचे..
रुजलेले कवितांचे अंकुर

पाउस.. पाउस.. पाउस
दिवसभर....
रात्रभर....
आभाळभर....
डोळाभर....
कविताभर....
मन भर....
पाउस.. पाउस.. पाउस
मनभर तरी मन भरतच नाही
बरसताना असतो पण उरतच नाही

खूप खूप दिवस राहून मग कशीबशी निघते
थोडासा पाउस माझ्या मनात भरून आणते

पाउस.. पाउस.. पाउस
माझ्या मनातला पाउस, अजून काही महिने
या ओसाड मातीत जपायचाय..
कवितेचा बहर, या मृगजळातच,काही काळ
असाच कोमेजू न देता जगवायचाय..

थोडासा पाउस..
थोडसं मृगजळ..
थोडसं प्रेम..
थोडासा वेळ...
कवितांना बहर...
कवितांचा बहर...
असाच.. कोमेजू न देता ...जगवायचाय
पुढच्या पावसापर्यंत...
त्या सदाहरित, पावसाळी देशात..घरी
कायमचं परतेपर्यंत..

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...