Friday, July 2, 2010

सांजवेळ


सूर्य अजून बुडालेला नाही..
ढगांच्या मागे थोड़ी प्रकाशाची तिरीप आहे.
पल्याड दिवस झालेला नाही..
अल्याड दिवेलागणी, इथे रात्र समीप आहे.

वारा घोंगावतो माझ्या ग्लासात..
मला त्याचीच थोड़ी पिसाट झिंग चढ़ते.
तसच कुणीतरी घोंगावत मनात..
आठवणीची दाटी, आभाळही कातर भासते.

घरात दिवा लावलेला नाही..
काही काळ सावल्यांशी मला खेळत राहायचय.
चंद्र अजून उगवलेला नाही..
वरच्या कुणालातरीही असच काहीतरी करायचय.

कुठलतरी काम आठवत अखेर..
आणि मी उठते, आत जाऊन दिवा लावते.
ढगही पांगतात, चंद्र दिसतो..
आणि ती हळवी, कातर सांजवेळ, तेव्हा सरते.

पळत राहायच..
एकेक काम करत..
वाहात राहायच..
काळा बरोबर..
ढगां बरोबर..
वार्‍या बरोबर..
पळत राहायच !
कामाच्याच मागे..
दिवस सरतात !
सांजवेळाही...
आणि रात्री... ?
जाऊ दे !
डोळे मिटले वा नाही
सकाळ तर होतेच ना....

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...