Friday, July 2, 2010

mid summer night's dream


अजूनही वसंतातल्या अर्ध्या रात्रीची स्वप्ने तुझ्या शोधात वणवण फिरतात
पण मध्यरात्रीचा सूर्य शोधताना त्यांना भेटताहेत, काजवेच काजवे
सांगितलं मी, फुटले असतील तुझ्या सृजनशक्तीला कल्पनांचे धुमारे
पण हिरव्या कुंचल्याला शोधताना त्यांना भेटताहेत, बाभळीच बाभळी
सांगितलं मी, उमलत असेल तुझ्या आरोहीने क्षितिजावर पहाट
पण मनस्वी साधकाला शोधताना त्यांना भेटताहेत, भोंगेच भोंगे
सांगितलं मी,विखुरला असेल दशदिशांत तुझ्या कीर्तीचा सुगंध
पण अवखळ कस्तुरीमृगाला शोधताना त्यांना भेटताहेत, फायेच फाये
सांगितलं मी, घेतली असेल तुझ्या महत्वकांक्षांनी एव्हाना आकाशभरारी
पण झेपावलेले गरूडपंख शोधताना त्यांना भेटताहेत, पारवेच पारवे
सांगितलं मी, फुंकली असशील मैंफिलीत सख्या नव्याने तू जान
पण जाणकार रसिक शोधताना त्यांना भेटताहेत, व्यसनीच व्यसनी
सांगितलं मी, जिंकली असशील एकाच प्रवेशात सगळयांची हृदये 'जादू'ने
पण उदार नटसम्राट शोधताना त्यांना भेटताहेत, याचकच याचक
सांगितलं मी, तू ही शोधत असशीलच तुझ्यासारखीचं अनुश्री
पण कदाचित तुझ्या स्वप्नांनांही वाटेत भेटताहेत, चकवेच चकवे !

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...