Friday, September 24, 2010

इथे..मोठ्या उत्साहात मुशाफिरीला निघालो खरं,
पण ह्या सार्‍याशी,
आधी कधीची तरी, खूप मुश्किलीने, सोईने नव्हे,
पुसून टाकलेली ओळख आहे,
विसरलेच होते.

परिचित आहेत सगळी वळणं,
खाचखळगे, चकवे आणि
पुन्हा सारं 'अहं' पाशी येऊन कोलमडणं..

इथल्या संदिग्ध धुक्यात मौनाच्या,
पावलोपावलीच्या कातळांवरच्या
ओरखड्यांच्या, आडोशाला जपून ठेवल्यात
तू, मी, आपापल्या आठवणी,
विसरलेच होते.

आणि आता हे नवे शब्दभ्रम
जुन्याचं समेवर भेटत असताना,
जिव्हाळ्याचा एक क्षण तरी सोसेल की नाही,
हेही विसरलेच होते.

पुन्हा त्याच असोशीने जगण्याला सामोरं जायचं असं ठरवून,
मैलोन् मैल चांदणं तुडवून जमवलेलं सारं,
कालच्या पावसात वाहून गेलं..

नको आता..
परत कुणाच्याच नजरेत मला 'तो' कोडगेपणा बघायचा नाहीये,
इतकी ओळख झाल्यावर..

आधीच्या पावसाळ्यातली एक कविता आहे..
नंतरच्या कश्यातूनच 'त्या'ला वगळता येईल की नाही,
यावर कालचा पाउस नवे प्रश्न उमटवून गेलाय..
त्यांची निसंदिग्ध उत्तरं तरारून येईस्तोवर, मला थांबलचं पाहिजे..तुझा आवाज ऐकत राहाते..
किती पावसाळे बरसू लागतात
ह्या कुशीवरून.. त्या कुशीवर..
ह्या रात्रीतून.. त्या रात्रीत..
किती वर्ष ओघळू लागतात
ह्या वाटेतून.. त्या वाटेवर..
आठवणींतून.. आठवणीत

तुझा आवाज ऐकत राहाते..
चित्रच चित्रं मनात साचतात
अचाट स्वप्नं..पाण्यावर स्वार..
तरंगातून गोल गोल वर्तुळ..
त्या होडीला किनारा सापडला?
मजा होती..खूप मजा होती.
डोळे मिटताक्षणी झोप यायची

तुझा आवाज ऐकत राहाते..
दिवस कसे वाहून गेले..सहज
उरल्या अस्पष्ट खाणा..खुणा..
उगाच अस्वस्थ करून जातात
कुठेतरी खोलवर भिजवून गेलेत
दरवेळी वाटत हे थांबूच नये..
आणि थांबाव इथेच असं ही..

तुझा आवाज ऐकत राहाते..
किती प्रहर सरले.. का रात्रच ?
पावसाळा.. का आयुष्यच !
अजून एक, असं समजवायचं
फक्त ! हा आनंद आणि विषादही..
मी असेन असं म्हणाला होतास..
पण सगळचं धूसर..तुझा आवाजही

मला काहीच ऐकू येत नाही..
इथे..

2 comments:

  1. he wachlya nantar watle ki time stop zalay. barach wel parat parat wachat hoto.
    btw, superb lihileys tu.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...