Wednesday, August 21, 2013

उंच माझा शोक !

फक्त श्रद्धांजली वाहून कसं चालेल ?
आजच्या काळाशी सुसंगत विचार करायला हवा.

किमान काही माणसांसाठी, ज्यांच्या साऱ्या निष्ठा त्यांचा व्यवसाय आणि अभ्यास यातच गुंतलेल्या आहेत,
धर्म, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा ह्या चैनीच्या गोष्टी आहेत...
म्हणजे फटाके उडवणं किंवा रोज ठरावीक वेळेची टी व्ही वरची सिरीअल पाहता येणं , आभाळाशी स्पर्धा करणारे सप्त तारांकित गणपती, किंवा असले कोटी कोटी आणि कोट्याधीश ईश त्यांची प्राथमिक भक्ती वा त्यांचा ठेका धरलेले बाबाआदम त्यांची माध्यमिक (मराठीच औपचारिक शिक्षण एव्हढ्यावरच थांबलं !) भक्ती करणं, सत्यनारायण, तासन तास पूजा-अर्चना, पंथ आणि सामुदायिक प्रार्थना, लाखो रूपयांचे लग्नसमारंभ, मंगळागौरी , श्रावण वगैरे वगैरे !

मला तर आता स्वप्नातही अशी चैन परवडायला उशीर झालाय !
वाया गेलेली डोकी आम्ही ! पुल आणि सुनीताबाई यांच चार आण्यातलं रजिस्टर्ड लग्न म्हणजे रोमैंटिसीझम ची हाईट वाटते आणि त्यांच्या सामाजिक भानाचा आदर्श ठेवणं हे कर्तव्य,  म्हणून लोकांनी मुर्खात काढलंय
 मला बऱ्याच वेळा !

पण माझा व्यवसायच असा आहे की मला अशी डोळे झाकून घ्यायची आणि गप्प बसण्याची चैन करताच येत नाही !

पोटात आणि डोसक्यात भुतं घेऊन जगतात इथले लोकं. ऑपरेशन करून जठरातला केसांचा गोळा काढून दाखवल्यावरही मुश्किलीने घरच्यांची खात्री पटते की ही करणी बिरणी ची भानगड नाही.
पण... ही मुलगी, लहान वयात लग्न झाल्याचा ताण न सहन झाल्याने केस खाते आणि तिला मानसोपचारांची गरज आहे,  हे त्यांना कळण्यापर्यंत आमची उडी पोहोचतच नाही !
जीव वाचवण्यावर समाधान मानावे लागते आणि  त्या जीवाचं पुढं काय होईल,  ह्या विचाराला, पेशंट बरोबर डिस्चार्ज द्यावा लागतो.

सुरक्षित बाळंतपण आणि सुरक्षित गर्भपात या सारख्या मूल(!)भूत गोष्टींपासून लाखो बायका वंचित आहेत.
 आत्ताही माझ्या वॉर्डात एक बाई पडल्ये, जिचा असुरक्षित गर्भपातामुळे झालेल्या संसर्गातून एक पाय निकामी झालाय आणि जीवही महत्प्रयत्नांनी वाचलाय.
आता तिचा पाय कापावा की नाही हाही मोठ्ठा पेच आहे. कारण तसंही पाय नसलेल्या गरीब बाईच भविष्य मरणाहून चांगलं थोडी असेल ? शी -शू रोजचं कोण करणार तिचं ? आणि किती काळासाठी  ?
पण तिचा नवरा भारतीय पुरुष असूनही चांगला म्हणायचा.

 "तुमचा हा मुलांचा कारखाना बंद करा नाहीतर, जीव जाईल या बाईचा आणि मग असलेल्या मुलांचं काय होईल?" असं मी पहिल्याच फटक्यात सांगितल्यावर, ज्या जबाबदारीने हा माणूस वागला म्हणून सांगू .

शेवटी न रहावून मी त्याला म्हंटलं की बायकोने नवऱ्यावर असं संकट आल्यावर अश्या गोष्टी करणं गृहीत धरलेलं असतं. पण बायकोला माणूस म्हणून वागवणारे तुम्ही एक दुर्मिळ नवरा आहात ( की दुर्मिळ नवरे आहात म्हणायचं ? की अश्या चांगल्या गोष्टी अनेकवचनं नसतात ? की इथल्या गुजराती मुळे गोंधळ उडतोय कारण इथे नवरा याचा अर्थ रिकामटेकडा माणूस !! असो :)
सध्या तिचे आई वडील आणि सासू सासरे यांच्यात दुमत असल्यामुळे, शस्त्रक्रियेच्या परवानगीची वाट पाहत आहोत.

माझ्या संपर्कात येणारे असले शेकडो गरीब रुग्ण आणि त्यांच्या व्यथा पाहून असं वाटतं की..
ज्यांना धर्म, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा अशी चैन करणं परवडतं पण त्याचबरोबर दाभोळकर किंवा तसे असंख्य वेगवेगळ्या विषयातले सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी केलेलं काम किंवा आजूबाजूच्या माणसांबद्दल ज्यांना अनुकंपा वाटते, त्यांनी किमान आपल्या असल्या चैनीचे प्रदर्शन मांडू नये. आणि कोणी मांडल्यास त्याला उत्तेजन देऊ नये. खरचं !

कारण वर्षांनुवर्षे सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी घसा खरवडून घेऊनही लोकांना आरोग्यविषयक चार चांगल्या सवयी लागत नाहीत. पण व्यसनं आणि अंधश्रद्धा यांच्या चलनवलनासाठी टी व्ही सिरीअल चा एक एपिसोड पुरतो.  "उंच माझा झोका" बघून किती रमाबाई प्रेरित झाल्या कोण जाणे पण "भाग्यलक्ष्मी " वगैरे प्रसारित करणारे हेच बेजबाबदार लोक ! अश्या सिरीअल्स बघताना लाखो अशिक्षित प्रेक्षकानी तारतम्य बाळगल्याच गृहीत धरणं म्हणजे चैनलची चैनच !

असे एक एक एपिसोड आणि सुशिक्षितांनी मांडलेली सश्रद्धतेची प्रदर्शनं , महाराष्ट्राला शेकडो वर्ष मागे घेऊन जातात.

इथे देशाला कांदा परवडत नाही आणि आपलं काय चाललय काय?


Note part 2 :ओ चे प्र आणि अ ची उ


ओ :  नोट छानच आहे. काही मुद्दे आहेत माझे...२-३ महत्वाचे आणि १-२ फुटकळ !!

अ:  :) नमामि वगैरे अशीच सुरुवात हवी , तुझ्या ज्ञानाला मी शरण आहे , but you already know that !  


प्र १. लाखो रूपयांचे लग्नसमारंभ... ह्यात कुठल्या श्रद्धेचा प्रश्न असतो ?? निव्वळ हौस किंवा पैशाचे प्रदर्शन किवा असलेच काही उद्देश असतात. असलीच तर ही खरी चैन नाही का ? आणि चैनीची व्याख्याच मुळात व्यक्तीसापेक्ष आहे नाही का ?? पु. लंच चे एक पात्र रोज शिकरण आणि मटार उसळ ही चैनीची परमावधी आहे अस म्हणते त्याची आठवण झाली . ..त्यामुळे 'भक्ती करणं, सत्यनारायण, तासन तास पूजा-अर्चना, पंथ आणि सामुदायिक प्रार्थना' ह्याबरोबर 'लाखो रुपयांचे लग्नसमारंभ ....' जोडणं कितपत सयुक्तिक ??अर्थात जर विधिवत् केला जाणारा लग्नसंस्कार याविषयी काही प्रश्न /आक्षेप इ. असले तर तो मुद्दा वेगळा आहे. ज्यांना असे संस्कार/विधी केले जाऊ नयेत असे वाटते, ते अतार्तिक आहेत असं वाटते त्यानी तसे करू नयेत.. बुद्धीप्रामाण्य, विवेकवादी विचार आणि त्याला सुसंगत अशा कृती हा पर्याय खुला आहे (त्या बाबतीत पु.ल-सुनीताबाईचा उल्लेख झालेलाच आहे )


उ : 

मी त्यात फटाके उडवणं वगैरे गोष्टी पण घातल्यात आणि पाणी, वीज यांचा गैरवापर इत्यादी इत्यादी पण त्यातच लिहीण्याच डोक्यात होत. त्यांचा श्रद्धेशी संबंध कुठेय ? निव्वळ हौस किंवा पैशाचे प्रदर्शन….  अगदी बरोबर ! पण अश्या गोष्टींच समर्थन करायला लोक, दिवाळी किंवा लग्नसमारंभ अशी कारण देऊन ,परंपरा आणि रूढीं पाळण्यावर असलेल्या श्रद्धेचा आडोसा घेतात हे मला आवडत नाही. 


चैन ही सापेक्ष गोष्ट आहे  … मलाही हेच तर म्हणायचं … की चैन ही सापेक्ष आणि गोष्ट "असावी" !!!! पण एखादी गोष्ट "सापेक्ष" होण्यासाठी दुसऱ्याचे भान असावे लागते. डोळसपणा नाही का लागत ?


उद्या एखाद्याने जर एखाद्या उपाशी मुलासमोर मजेत मटार उसळ खाल्ली, तर माझ्या "सापेक्ष" ती चैन च नाही तर क्रूर गोष्ट आहे.  पण माझं जाऊ दे. 


माझा पेशंट मला सांगतो की बाईगं माझ्या गावाहून एसटी  च एकशे तीस रुपये तिकीट आहे , माझी रोजंदारी बुडवून मी आज आलो , तू आजचं माझा निकाल लाव , पुन्हा इथे मी येऊ शकणार नाही .!


मी मालेगावला कित्येक मजूर आणि रंगारी, अतिशय अनारोग्यात, नानाविध व्यवसाय निगडीत व्याधींनी ग्रस्त अवस्थेत हातमागावर काम करताना पाहिलेत आणि डॉमिनोज मध्ये पिझ्झा खाताना मला कायम त्या रंगारी आजीचे चिरा पडलेले फाटके हात आठवतात , माझ्या पिझ्झाच्या एका स्लाईसची किंमत आणि तिचा एक महिन्याचा पगार याचा आकडा एकच असतो  !


माझं अनुभवविश्व पहा , किंवा माझच बरोबर , असं अजिबात नाही. खरच मनापासून नाही ! फक्त हे सगळ सांगावस वाटत… कदाचित हे वाचणाऱ्या एखाद्या सुशिक्षित माणसाला जेवताना , पिझ्झा खाताना, हॉटेलात, गणपतीचा नैवेद्याचा किंवा लग्नाच्या पंक्तीचा मेन्यू  ठरवताना …  त्या आजीची आठवण येईल आणि कदाचित त्यांना अन्नाची नासाडी ही एक नको नकोशी चैन वाटू लागेल… अस वाटत राहात. प्र२. प्रश्न उत्पन्न होतो तो धर्म, श्रद्धा इ. गोष्टींचे बाजारीकरण केल्यामुळे. टिळकानी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव ह्याचे उत्तम उदाहरण ठरावे. म्हणजे खरतर विरोध हा बाजारीकरणाला हवा ना कारण कुठल्या गोष्टी बाजारात आणाव्या किंवा आणू नयेत याचे निकषच आपण तपासून बघत नाही. कारण एकदा का बाजारात गोष्टी आणल्या की बाजाराचे स्वतःचे नियम त्याना लागू होतात... Michael Sandel म्हणतो तसं "..are we having market-based economy or are we becoming market-society ?? "

प्र३. माध्यमांच्या बाबतीतही हाच मार्केट इकॉनॉमी चा मुद्दा लागू होतो. कोणे एके काळी वृत्तपत्रे चालवणारे अघोषित पण मूल्याधिष्ठीत अशी काही आचारसंहिता / तत्वं मानणारे होते. आज त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे ?? मग मनोरंजन करणाऱ्या वाहिन्या (यात झी- मराठी सारख्या मराठी पासून कलर्स सारख्या पर्यंत सगळ्या हिंदी आणि अर्थात इंग्रजी वाहिन्या सुद्धा आल्या ) आम्ही असे कार्यक्रम दाखवतो कारण टी.आर.पी वाढतो / लोक बघतात यासारखी कारणे देतात. सणाच्या, श्रद्धेच्या 'Event Management Companies ' कोणी केल्या ?? साधू-बाबा लोकांचा दोष हा की त्यानी ह्याच्या 'Franchise' घेतल्या...

उ :

 इकॉनॉमिक्स माझा विषय नाही . पण आपण बाजारीकरण टाळू शकत नाही, हे खर ना ? पण एखाद्या गोष्टीच्या बाजारीकरणाने त्या मागचा मूळ हेतू डावलला गेल्याचे दिसत असताना , त्यातला आपला उत्तेजनार्थ आणि उत्साही सहभाग आपण विचारपूर्वक निर्धाराने टाळू शकत नाही का ?

देश पारतंत्र्यात असताना मी माझे मनोरंजन कसे करून घेऊ ? अस म्हणून सावरकरानी बालगंधर्वांना गाण न ऐकता परत पाठवल्याचा किस्सा आहे 

 सगळ्यांना अण्णा व्हायचय… कारण आपली चड्डी  तेव्हढीच ! पण सावरकरांचाही वारसा चालवण्याची जबाबदारी आपलीच आहे न? प्र४.आता राहता राहिला कांदा परवडण्याचा मुद्दा कांदा परवडत नाही म्हणून कोणी २ सिगारेटी कमी फुंकल्याचे पाहण्यात आले काय ?? तसच काहीस ह्याही गोष्टींच ! (संबंधित मुद्दा- धर्म / श्रद्धा एक बचाव प्रणाली (a Defence Mechanism) अशी मांडणी असणारे संशोधन-साहित्य आहे, psychology/psychiatry च्या जिज्ञासू लोकांकरता चांगला विषय आहे !) 

उ :

कांदा जाऊदे डोळ्यात… But I think आपल्या इगो च्या Defence साठी "ritual" हा neurotic defence mechanism वापरण पुरे झालं we need to be brave and evolve and turn to mature defences like humor and altruism !प्र५. "...की इथल्या गुजराती मुळे गोंधळ उडतोय कारण इथे नवरा याचा अर्थ रिकामटेकडा माणूस !" असा अर्थ फक्त गुजराथीतच होतो का अन्य भाषाभगिनी पण यात सामील आहेत ??  उ :

तसा शब्दश: अर्थ गुजराथीतच होतो , बाकी जो जे वांछील तो ते लाहो….  :)


ज्ञानेश्वर :) :) ग्रेट ज्ञानेश्वर, ग्रेट सावरकर :) :) आपल्यातलेच पण किती द्रष्टे !!!! 


देवा , डोळ्यांची साथ येते तशी डोळसपणाची यावी. 
3 comments:

  1. khar ahe tumach mhanan!!! ajun kiti mage ahot apan. ani mahasatta whayachi diwaswapn pahatoy

    ReplyDelete
  2. Very nice mam....keep writing..its thought provoking....all the best..!!

    ReplyDelete
  3. Kupach Chan Lekh!

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...